Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

AHILYANAGAR TODAY NEWS : राहात्यात धक्कादायक घटना ! मुलाकडून वडिलांची फरशीने हत्या ; आरोपी जेरबंद

AHILYANAGAR TODAY NEWS : राहात्यात धक्कादायक घटना ! मुलाकडून वडिलांची फरशीने हत्या ; आरोपी जेरबंद

राहाता | वार्ताहर (Ahilyanagar Times 24 News)

राहाता शहरात शुक्रवारी संध्याकाळी एक थरारक आणि हृदयद्रावक घटना घडली. नशेच्या अवस्थेत असलेल्या मुलाने आपल्या वडिलांच्या डोक्यात फरशी घालून त्यांची निर्घृण हत्या केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला तात्काळ अटक केली आहे.

मृत व्यक्तीचे नाव उत्तम खैरे असे असून, आरोपी मुलगा सचिन खैरे असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना राहाता शहरातील घोलप मंगल कार्यालयाजवळील परिसरात घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी सचिन खैरे हा वारंवार आपल्या वडिलांना मारहाण करत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. कुटुंबातील वाद, सततचे भांडण आणि दारूचे व्यसन यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण होते.

शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास सचिन खैरे हा नशेत होता. त्याच वेळी संतापाच्या भरात त्याने वडील उत्तम खैरे यांच्या डोक्यात फरशी घालून त्यांची हत्या केली. या भीषण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ राहाता पोलिसांना कळवले. पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक लेंडे आणि कोमल कुमावत यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि आरोपीला ताब्यात घेतले.

मृतदेह पंचनामा करून पुढील तपासासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू असून, कुटुंबातील वाद आणि दारूचे व्यसन हे प्राथमिक कारण असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, या घटनेमुळे राहाता शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Leave a comment