nashik crime : क्लासमध्ये बसण्याच्या जागेवरून घडली एक दुर्दैव घटना
यशराजच्या वडिलांचे कोरोनाकाळात निधन झाले असून, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आईवर आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी आई रिक्षा चालवते. यशराजचा मोठा भाऊ एमबीएचे शिक्षण घेत असून, यश दहावीच्या परीक्षेची तयारी करत होता. मात्र, शनिवारी अचानक घडलेल्या या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
nashik crime :
यशराजच्या वडिलांचे कोरोनाकाळात निधन झाले असून, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आईवर आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी आई रिक्षा चालवते. यशराजचा मोठा भाऊ एमबीएचे शिक्षण घेत असून, यश दहावीच्या परीक्षेची तयारी करत होता. मात्र, शनिवारी अचानक घडलेल्या या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सातपूर : येथील राज्य कर्मचारी वसाहतीतील एका क्लासमध्ये शिकणाऱ्या इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांमध्ये बेंच पुढे घेण्याच्या कारणावरून झालेल्या हाणामारीत एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. शनिवारी (दि. २) सायंकाळी घडलेल्या या घटनेप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. संशयितांना रविवारी (दि. ३) न्यायालयात हजर केले असता, बाल न्याय मंडळाने त्यांना ताब्यात घेतले असून, त्यांची रवानगी बाल निरीक्षणगृहात करण्यात आली आहे.
दिलेल्या माहितीनुसार, यशराज तुकाराम गांगुर्डे (वय १६, रा. अशोकनगर, पवार संकुल) असे खून झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. एकाच क्लासमध्ये शिकत असलेल्या यशराज व दोन विधीसंघर्षित विद्यार्थ्यांमध्ये क्लासमधील बेंच पुढे घेण्याच्या कारणावरून काही दिवसांपूर्वी किरकोळ वाद झाले होते. त्याचा राग मनात धरून दोन्ही बालकांनी शनिवारी सायंकाळी क्लासच्या बाहेर यशराजला शिवीगाळ करत, लाथा बुक्क्यांनी छाती व बरगड्यांवर जबर मारहाण केली. यात यशराज जखमी होऊन बेशुद्ध पडला. त्याला उपचारार्थ शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

दरम्यान, सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले. जिवे ठार मारल्याप्रकरणी त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी त्या दोन्ही विधीसंघर्षित बालकांना न्यायालयात हजर केले असता, बाल न्याय मंडळाने त्यांना ताब्यात घेतले असून, त्यांची रवानगी बाल निरीक्षणगृहात करण्यात आली आहे. नाशिकच्या निरीक्षण गृहात जागा उपलब्ध नसल्याने त्यांना मनमाड येथील निरीक्षण गृहात पाठविण्यात आले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भडांगे करीत आहेत.
