Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना ‘फ्रीझ’ करण्याचा भाजपचा मास्टरप्लान? महायुतीतील जोरदार वादळ उठण्याचे संकेत…पहा सविस्तर
Maharashtra Politics : राज्यात सत्तेचा खेळ पुन्हा एकदा रंगतदार वळणावर आला आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या घरात थेट बेडरूमपर्यंत जाऊन बॅगांचे व्हिडीओ चित्रीत होणं म्हणजे केवळ गोपनीयतेचा भंग नाही, तर सत्ताधाऱ्यांवर ठेवली जाणारी ‘निगराणी’ किती खोलवर पोहोचली आहे, याचा स्पष्ट संकेत आहे.
मुंबई | Mumbai
Maharashtra Politics : राज्यात सत्तेचा खेळ पुन्हा एकदा रंगतदार वळणावर आला आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या घरात थेट बेडरूमपर्यंत जाऊन बॅगांचे व्हिडीओ चित्रीत होणं म्हणजे केवळ गोपनीयतेचा भंग नाही, तर सत्ताधाऱ्यांवर ठेवली जाणारी ‘निगराणी’ किती खोलवर पोहोचली आहे, याचा स्पष्ट संकेत आहे. ही घटना घडत असतानाच, अधिवेशन सुरु असताना हा व्हिडीओ बाहेर येतो – हेही फार काही सांगून जातं. त्याचवेळी, एकनाथ शिंदे (Maharashtra Politics) हे स्वतःच त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी धडपडताना दिसत आहेत.
तीन वर्षांपूर्वी बंड करून भाजपसाठी गेमचेंजर ठरलेले शिंदे आता त्यांच्या ‘राजकीय बंधनांत’ सापडले आहेत. भाजपच्या नीट आखलेल्या रणनीतीमुळे शिंदेंची उपयुक्तता आता संपली का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतोय. शिवाय महापालिका निवडणुकीच्या (Maharashtra Politics) पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या इनकमिंगच्या गर्दीत शिंदेंचं ‘बार्गेनिंग पॉवर’ वाढू नये म्हणून भाजपकडून काटेकोर प्रयत्न सुरु झालेत. हीच अस्वस्थता घेऊन शिंदे थेट दिल्लीत पोहोचतात, पण त्यांच्या हालचालींमागील ‘गूढ’ अजूनही मिटलेलं नाही.
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या घरात घडलेली घटना ही केवळ खळबळजनक नाही, तर थेट सत्तेच्या गाभ्यावर घाव घालणारी आहे. मंत्र्यांच्या खासगी बेडरूममध्ये (Maharashtra Politics) प्रवेश करून बॅगांचे चित्रीकरण करण्यात येणं आणि नंतर अधिवेशन सुरू असतानाच तो व्हिडीओ सार्वजनिक होणं – ही बाब अत्यंत गंभीर आहे. यामधून फक्त वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आहे असं नाही, तर शिंदे गटातील मंत्र्यांवर बारीक नजर ठेवणारी कोणतीतरी यंत्रणा सक्रिय असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
मंत्र्यांच्या घरात इतक्या सहजतेने घुसून चित्रीकरण होऊ शकते, तर अन्य मंत्री किंवा आमदार यांच्याबाबत काय परिस्थिती असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. त्यामुळे या घटनेमागे राजकीय सूडाचा (Maharashtra Politics) भाग आहे का? कुणीतरी मुद्दाम ‘पोलिटिकल प्रेशर’ तयार करण्यासाठी हे खेळ खेळतोय का? असे सवाल निर्माण झाले आहेत. या सगळ्या प्रकारामुळे शिंदे गटात अस्वस्थतेचे वातावरण तयार झाले असून, अनेक नेत्यांमध्ये भीतीचे आणि संशयाचे सावट दाटून आले आहे.
एकनाथ शिंदे यांचं राजकारण पुन्हा एकदा वळणावर येऊन ठेपलं आहे. तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत मोठं बंड घालून त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत सत्ता स्थापनेसाठी निर्णायक भूमिका घेतली. त्यावेळी शिंदे ‘राजकीय हिरो’ म्हणून उदयास आले. पण सध्या तेच शिंदे राजकीय कोंडीत अडकले आहेत – आणि ती कोंडी विरोधकांनी नाही, तर स्वतः भाजपने निर्माण केल्याचं चित्र आहे.

शिंदेंच्या बळावर सत्तेच्या गादीवर पोहोचलेल्या भाजपने आता त्यांच्याच राजकीय पायाखालची जमीन खणायला (Maharashtra Politics) सुरुवात केल्याचे संकेत मिळत आहेत. विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंचा प्रभाव कमी करण्यासाठी भाजप रणनीती आखतोय, असं जाणवू लागलं आहे. भाजपची ही खेळी शिंदेंना अस्वस्थ करून गेली असून, त्यांनी दिल्ली गाठून अमित शहा आणि राजनाथ सिंह यांची गुप्त भेट घेतल्याची माहिती पुढे आली आहे. याच दरम्यान, शिंदेंनी मुंबईतील एका महत्त्वाच्या उद्घाटन कार्यक्रमालाही अनुपस्थित राहिल्यामुळे चर्चा अधिकच रंगल्या आहेत. त्यांच्या एकेक हालचालीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे.
राजकारण म्हणजे केवळ सत्तेचा खेळ नसतो, तर ती एक कधी लपवाछपवी, तर कधी उघड उघड दबावाची रणनिती असते. एकनाथ शिंदेंच्या सत्तेच्या प्रवासातही (Maharashtra Politics) आता अशाच रणनितीचे पडसाद उमटू लागले आहेत. केंद्रातील भाजपने विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी ईडी, सीबीआय, आणि आयकर विभागासारख्या यंत्रणांचा वापर केल्याचा आरोप अनेकदा झाला आहे. मात्र, आता हीच पद्धत स्वतःच्या मित्रपक्षांवर वापरण्यात येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
शिंदेंचे निकटवर्ती दोन प्रमुख सहकारी जे ‘डावे-उजवे हात’ म्हणून ओळखले जातात. सध्या परदेशात आहेत, आणि त्यांना नोटिसा बजावण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनाही आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे, अशी माहिती खुद्द सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिली. एवढंच नाही, तर शिरसाट यांनाही नोटीस मिळाली आहे.
या घडामोडींमुळे शिंदेंभोवतीचे राजकीय वर्तुळ अधिकच ताणले गेले असून त्यांनी तात्काळ दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. या भेटीचा तपशील गुलदस्त्यात असला, तरी शिंदेंच्या चेहऱ्यावरील चिंता आणि हालचालींची घाई काहीतरी मोठं घडण्याचं संकेत देत आहेत. दरम्यान, खासदार संजय राऊत (Maharashtra Politics) यांनी केलेला दावा की शिंदेंनी भाजपात विलीन होण्याची तयारी दाखवत मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी प्रस्ताव दिला होता, यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. राऊत यांच्या दाव्याला पुष्टी मिळते की खंडन, हे पाहणं आता अत्यंत रंजक ठरणार आहे.

राज्याच्या राजकारणात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी जोर पकडला असतानाच भाजपने धडाकेबाज निर्णय घेत, पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे ठाणे जिल्ह्यातील वजनदार नेते रवींद्र चव्हाण यांच्या हाती सोपवली आहेत. विशेष म्हणजे, यावेळी दिल्लीतून नेहमीप्रमाणे थेट नाव जाहीर न करता भाजपने लोकशाही प्रक्रियेचा ‘देखावा’ करून निवडीचा मोठा इव्हेंट उभा केला. चव्हाण यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानेच त्यांना प्रदेशाध्यक्षपद देऊन पक्षाने शिंदे गटाच्या चिंतेत भर घातली आहे.
शिंदे व चव्हाण यांचं ठाण्यातील राजकीय नातं फारसं सौहार्दाचं कधीच नव्हतं. आता चव्हाण यांची नियुक्ती ही शिंदेंच्या वर्चस्वावर ‘कात्री’ चालवण्याची भाजपची स्पष्ट रणनीती असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. ठाणे, पालघर आणि कोकण विभागात मित्रपक्षाबरोबरच लढा द्यावा लागेल, अशी स्पष्ट जाहीर घोषणा चव्हाण यांनी करूनच पुढील सत्तासंघर्षाचं चित्र स्पष्ट केलं आहे.
राज्याच्या राजकारणात सध्या नाट्यमय वळण आले असून, ठाकरे बंधूंना पुन्हा एकत्र येण्याची राजकीय संधी मिळाली आहे आणि तीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका निर्णयामुळे! विधानसभा निवडणुकीतील (Maharashtra Politics) पराभवाने राजकीय अस्तित्वासाठी झगडणाऱ्या उद्धव व राज ठाकरे यांना ‘हिंदी सक्ती’च्या मुद्द्यावरून एकत्र येण्याचा प्लॅटफॉर्म सहज उपलब्ध झाला आहे. विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दोघेही एकत्र आल्यास शिंदे गटाच्या गणितावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
शिंदेंची योजना राज ठाकरे यांना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंना एकटे पाडण्याची होती. पण फडणवीसांच्या ‘हिंदी’ खेळीने शिंदेंच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. त्यातच मिरा-भाईंदरमध्ये पोलिसांनी मनसेच्या मोर्चाला परवानगी न दिल्याने मराठी अस्मिता पुन्हा पेटली आणि पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची बदली झाली. शिंदे संतापले, कारण आता गृहखात्यातील निर्णयांमध्ये त्यांचा प्रभाव कमी होत चालल्याचे स्पष्टपणे दिसते. हे सगळं शिंदेंच्या अस्वस्थतेला खतपाणी घालत आहे.
गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राजकीय दबाव आणि अडचणींचं सावट अधिकच गडद झालं आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी अमित शहा यांच्या उपस्थितीत “जय गुजरात” असा नारा दिला, पण हा नारा त्यांच्या संकटांवर फुंकर घालण्यात अपयशी ठरला. त्यातच मंत्री संजय शिरसाट आणि आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त कृतींमुळे शिंदे यांच्या डोकेदुखीत भरच पडली आहे.
शिरसाट यांच्यावरील आर्थिक आरोप, बॅगमधील नोटांचा व्हिडिओ आणि त्यांच्या घरातील चित्रीकरणाची घटना यामुळे त्यांच्याभोवती संशयाचं (Maharashtra Politics) जाळं निर्माण झालं आहे. त्याचवेळी, आमदार गायकवाड यांनी मंत्रालयाशेजारील उपहारगृहातील कर्मचाऱ्याला मारहाण करून सर्वसामान्यांच्या नजरेत शिंदे गटाची प्रतिमा धुळीस मिळवली. या घटनांमुळे शिंदेंची गोची वाढली असून, त्यांच्या गटातल्या ‘शिस्तीच्या धाग्यांची’ उकल आता सगळ्यांसमोर येऊ लागली आहे.

गेल्या काही महिन्यांत शिंदे गटाच्या आमदारांना एकामागोमाग एक वादग्रस्त प्रकरणांनी गाठले असून, ही सर्व प्रकरणं जणू नियोजित पद्धतीने बाहेर आणली जात असल्याचा सूर सत्ताकारणात (Maharashtra Politics) उमटू लागला आहे. अर्जुन खोतकर यांच्या धुळे दौऱ्यात सापडलेली रोख रक्कम, संदिपान भुमरे यांच्याशी संबंधित दारू परवाना घोटाळा, तसेच संजय राठोड यांच्या विभागातील संशयास्पद निविदा आहे. या सर्व घडामोडींमुळे शिंदे गटावरचे दबावचक्र अधिकच तीव्र होत आहे.
तसंच, देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे व अजित पवार गटाच्या मंत्र्यांना (Maharashtra Politics) हवे असलेले खासगी सचिव नेमण्यावर बंधन आणले आहे. त्यामुळे मंत्र्यांच्या कामकाजावर थेट नियंत्रण ठेवले जात आहे. फडणवीस यांच्या या नियोजनबद्ध आणि व्यवस्थापकीय शैलीमुळे महायुतीतील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हं दिसू लागली असून, हे शीतयुद्ध कधी उधळून पडेल हे सांगता येत नाही.
